अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे जागतिक व्यापारात तीन टक्के घट   

संयुक्त राष्ट्राचा अंदाज 

संयुक्त राष्ट्र : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढीव आयात शुल्काचा जागतिक व्यापारावर परिणाम होणार आहे. व्यापार सुमारे तीन टक्के घटेल, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला आहे. वाढीव आयात शुल्कामुळे निर्यात अमेरिका आणि चीनऐवजी भारत, कॅनडा आणि ब्राझिलकडे वळेल, असा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी कोणत्या देशावर किती आयात शुल्क लावणार याची यादी वाचून दाखवली होती. त्यानंतर त्यांनी चीन वगळता अन्य देशांसाठी १० टक्के प्रत्युत्तर शुल्क पुढील ९० दिवस आकारले जाईल, अशी नवी घोषणा केली होती. यानंतर चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर १२५ टक्के प्रत्युत्तर शुल्क लागू केले जाईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा भडका उडाल्यात जमा आहे. पर्यायाने त्यांचे परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची भीती संयुक्त राष्ट्राने व्यक्त करुन व्यापार तीन टक्के घटेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राच्या कार्यकारी संचालिका पामेला कोक हॅमिल्टन यांनी जीनिव्हा येथे वर्तविला आहे.
 
उदहारण देताना त्या म्हणाल्या, मेक्सिकोवरील आयात शुल्क अधिक आहे. त्यामुळे अमेरिका, चीन, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील निर्यात मेक्सिको कमी करुन ती अन्यत्र वळवेल. दरम्यान, कॅनडा, ब्राझिलच्या तुलनेत भारताला शुल्काची कमी झळ बसणार आहे. व्हिएतनाम सुद्धा अमेरिका, मेक्सिको आणि चीनऐवजी पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका, युरोपीय महासंघ कोरिया अन्य देशांत निर्यात वळवेल. त्या म्हणाल्या, विकसनशील देशांत वस्त्रोद्योग मोठा आहे. तेथील आर्थिक उलाढाल आणि कर्मचारी अधिक आहेत. वस्त्रोद्योगात बांगलादेश सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्याच्यावर ३७ टक्के आयात शुल्क लादले आहे. त्यामुळे २०२९ पर्यंत निर्यात मालापोटी  त्याचे सुमारे ३.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान होणार आहे.विकसनशील देश अगोदर विविध समस्यांंनी त्रस्त आहेत. त्यामध्ये संसर्गजन्य आजार, नैसर्गिक आपत्ती आणि अचानक बदलणारे धोरण यांचा समावेश आहे. आता आयात शुल्क लादल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबर त्यांच्या अर्थव्यवस्थेला झटका बसणार आहे. विकसनशील देशांनी अशा अनिश्चिततेच्या काळात दीर्घकालीन संरक्षणात्मक उपाय योजनांकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles